पुणे - पत्नीला अश्लील बोलल्याच्या कारणावरून मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. रोहित किसन कांबळे (वय १९), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी आरोपी आकाश साळवे (वय २५) आणि इलियाज शेख (वय २१) यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित किसन कांबळे याचे गुरुवारी अपहरण झाले होते. याप्रकरणी मृत रोहितच्या आईने वाकड पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार वाकड पोलीस रोहितचा शोध घेत होते. दरम्यान, आज पुण्यातील संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह सापडला आहे. या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर मित्रानेच खून केल्याचे उघड झाले आहे. मृत रोहित, आरोपी आकाश आणि इजियाज हे तिघे मित्र होते. वाकड ते काळेवाडी फाटा यादरम्यान रिक्षा चालवण्याचा व्यवसाय ते करत होते. मृत रोहित हा आकाशच्या पत्नीला अश्लील बोलला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वादही झाला होता. मात्र, आकाशला झालेली घटना स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने मित्र इलियाजच्या साथीने रोहितचे अपहरण केले.