पुणे- नशा करण्यासाठी पैसे नसल्याने एकावर धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनसह दोन सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.
घटनेबद्दल माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील
बरकत उर्फ लल्या मोहम्मद जमादार (१९), व विशाल जाधव (दोघेही रा.पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील एक गुन्हेगार हा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी संजय राजू पातारे (वय-१९, रा.आबा काटे चाळ दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी संजय हे दापोडी येथे पान टपरीचा व्यवसाय करतात. ते मित्राला भेटण्यासाठी सृष्टी चौक येथे दुचाकीवरून येत असताना त्यांना सराईत गुन्हेगार बरकत, विशाल जाधव आणि एका अल्पवयीन गुन्हेगाराने अडविले. त्यांनी संजय यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व तुझ्याकडे असणारे पैसे दे असा दम टाकला. यावेळी संजय यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुन्हेगारांनी कोयता आणि चाकूचा धाक दाखवला व पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला संजय यांनी विरोध केला. तेव्हा आरोपी विशाल ने त्यांच्या कानशिलात लगावत चाकू काढला. तेवढ्यात बरकत ने संजयच्या हाताच्या पंज्यावर कोयत्याने वार केला. यात संजय गंभीर जखमी झाला. त्यानंतर गुन्हेगारांनी त्याच्याकडून बळजबरीने १ हजार २०० रुपये काढून घेतले व तेथून पसार झाले. जखमी संजय यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिन्ही गुन्हेगार हे सराईत असून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बरकत याला सांगवी पोलिसांनी अटक केली असून विशाल जाधव याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, सर्व आरोपी हे नश्याच्या आहारी गेलेले होते. त्यासाठी त्यांना पैसे हवे होते. म्हणून त्यांनी तक्रारदारांना लुटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील करत आहेत.