अपहरणकर्त्या आरोपी बरोबर रेल्वे स्टेशन वरुन जातांना मुलगा पुणे :पिंपरी येथे राहत असलेल्या एका महिलेला दारूचे व्यसन असून; या दारू साठी ही महिला पुणे स्टेशन येथे आली. आणि ज्या माणसाबरोबर दारुचा पॅक बनविला, त्याच माणसाने त्या महीलेच्या मुलाचं अपहरण केलं होतं. ही बाब जेव्हा दारूची नशा उतरल्यावर त्या महिलेच्या लक्षात आली, तेव्हा तिने थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला थेट गुलबर्गा येथून अटक केली.
फिर्यादी महिला ही पिंपरीची रहीवाशी : इक्बाल हसन शेख (वय ३२, रा. पेडगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. गुलबर्गा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ही पिंपरी येथील असून; तिला दारूचे व्यसन आहे. ती आपल्या मुलासह ९ जानेवारीला पुणे स्टेशन येथे आली होती. तेथे तिने इक्बाल शेख याच्यासोबत दारू प्यायली.
मुलाला नेले होते गुलबर्गा येथे : दारु पिऊन नशेत झोपी गेल्यानंतर आरोपी शेख हा तिच्या मुलाला घेऊन पसार झाला. महिलेला पहाटे जाग आल्यानंतर मुलगा सोबत नसल्याचे लक्षात आले. या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेतला. तेव्हा आरोपीने मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करून, मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घटना :महिलेची दारु पिण्याची सवय आणि इतर परिस्थितीचा फायदा आरोपीने घेतला. याआधी देखील मुलांच्या अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अश्या प्रकारे एखादी महिला आपल्या मुलाबाबत एवढी बेजबाबदार कशी काय असु शकते? असा प्रश्न सामान्य जनतेमधुन उठतो आहे. आज पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. या आरोपीचे मुले विकणाऱ्या कुठल्या टोळीसोबत संपर्क आहे का? याचा तपास पोलिस करीत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.