पुणे-दोन दिवसांपूर्वी वादळी पावसात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मलठण गावातील 100 /22 केव्हीए गावठाण रोहित्रावर वीज पडल्याने तो नादुरूस्त झाला होता. यामुळे या रोहित्रावरील घरगुती आणि शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे हे रोहित्र बसवून देण्यासाठी गावकऱ्यांनी शुक्रवारी विनंती केली होती. राऊत यांच्याकडून याची दखल घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर 24 तासात रोहित्र बदलत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी ऊर्जा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मलठण ग्रामस्थांच्या तक्रारीची ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तात्काळ दखल घेतली. राऊत यांच्याकडून बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना मलठणमधील रोहित्र तात्काळ बदलून देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रोहित्र बदलून 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत केला, अशी माहिती मलठणचे माजी सरपंच विलासराव थोरात यांनी दिली आहे.