पुणे -साडेचार महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल्स, हॉटेल्स आणि इतर व्यवसाय अटी आणि शर्तीसह सुरू झाले आहेत. त्यामुळे शहर आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या मॉल्समध्ये नागरिक जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहून मॉल्समधील छोटे-मोठे व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून सर्व व्यवसाय बंद होते. जून महिन्यात व्यावसायिकांना महानगरपालिकेने अटी आणि शर्तींसह व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शहरातील मोठ-मोठे मॉल्स सुरू करण्यास बंदीच होती. गेल्या बुधवारी(५ ऑगस्ट) मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली. मॉलधारक आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या काळजी पोटी सर्व आवश्यक असलेल्या गोष्टी करत आहेत. हात सॅनिटाईझ करणे, टेम्परेचर तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत. असे असूनही मॉलच्या कुठल्याच दुकानात ग्राहक दिसत नाहीत. मात्र, शहरातील मॉल्स, हॉटेल्स आणि इतर व्यवसाय खुले झाल्याने शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची भावना जागृत होत आहे.