बारामती- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणाऱ्या गटा-तटाच्या राजकारणात कधीही भरून न निघणारे सामाजिक नुकसान होत असते. हे नुकसान टाळून सामाजिक सलोखा राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्यात असे, आवाहन खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या निवडणूका
इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. गावा-गावातील कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत...
गावचा कारभार एकोप्याने चालला तर गावचा सर्वांगीण विकास लवकर होतो. मात्र, निवडणुकांमुळे गावागावात गट- तट निर्माण होतात. त्यामुळे गावाच्या विकासात अडथळा निर्माण होतो. सहाजिकच गावांतील सामाजिक स्थिती नाजूक बनते. ही परिस्थिती बदलण्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे, आव्हान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
विकासामध्ये प्राधान्य मिळणार...
ज्या गावांमध्ये बिनविरोध निवडणुका होतील त्या गावांना भविष्यात विकासामध्ये प्राधान्य मिळणार आहे. अशा गावांमध्ये विविध योजना राबवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बिनविरोध गावांच्या यादीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी भरणे यांनी केले.