मुंबई :विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या संदर्भात प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आ. संग्राम थोपटे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, एनएसयुआयचे आमिर शेख आदी उपस्थित होते.
एकत्र लढवणार :दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील, त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.