पुणे : आयपीएलच्या धर्तीवर आता राज्यात महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटना 15 जून ते 29 जून दरम्यान पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करणार आहे. एमपीएल क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे 100 अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा सहभाग असणार आहे. या दरम्यान महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचेही आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेला मान्यता दिली आहे.
हे आहेत सहा संघ : एमपीएलच्या शिखर समितीने आज स्पर्धेत सहभागी 6 संघांची नावे निश्चित केली. सुहाना मसाले ग्रुपचा पुणे संघ 'पुणेरी बाप्पा' नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ 'कोल्हापूर टस्कर्स', ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ 'ईगल नाशिक टायटन्स', वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ 'छत्रपती संभाजी किंग्ज', जेटस सिंथेसिसचा संघ 'रत्नागिरी जेटस' आणि कपिल सन्सचा संघ 'सोलापूर रॉयल्स' नावाने ओळखल जाणार आहे.
नौशाद शेख सर्वात महागडा खेळाडू : एमपीएलसाठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला 6 लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले. त्यानंतर दिव्यांग हिंगणेकरसाठी रत्नागिरी जेटसने 4 लाख 60 हजार रुपयांची बोली लावली. साहिल औताडे (3 लाख 80 हजार), अंकित बावणे (2 लाख 80 हजार) या खेळाडूंनाही रत्नागिरी संघाने खरेदी केले. सोलापूरने सत्यजित बच्छावला 4 लाख 60 हजार रुपयांना खरेदी केले. शमशुझमा काझी (2 लाख 80 हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, ईगल नाशिक टायटन्सने सिद्धेश वीर (2 लाख 60 हजार), आशय पालकर आणि कौशल तांबे (प्रत्येकी 2 लाख 40 हजार) यांना खरेदे केले. पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी 2 लाख 40 हजार, तर रोहन दामलेसाठी 2 लाख रुपयांची बोली लावली.