पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी थेट शरद पवारांवर थेट टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावरून अजित पवार विरुद्ध शरद पवार गटात राजकारण तापण्यास सुरुवात झालीय. दिलीप वळसे-पाटलांच्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाडांनी सडेतोड उत्तर दिलंय. दरम्यान, आपण केलेल्या टीकेबद्दल दिलीप वळसे-पाटील यांनी सारवासारवही केली. मात्र तरीही कधीकाळी आपले स्वीय सहाय्यक असलेल्या दिलीप वळसे-पाटील यांनी केलेली टीका शरद पवार यांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
अजून राष्ट्रवादीत : अजित पवार गट हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर सातत्याने टीका केली जातेय. ईडीच्या धाकामुळे आपले काही सहकारी भाजपासोबत गेल्याची टीका शरद पवार यांनी एका सभेत केली होती. त्यावर दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, मी आणि इतर नेते युती सरकारमध्ये सामील झालो, म्हणजे आम्ही भाजपामध्ये गेलो, असं नाही. आम्ही 'राष्ट्रवादी काँग्रेस'सोबतच आहोत. आम्हाला ईडी, सीबीआयची नोटीस आली म्हणून आम्ही भाजपासोबत गेल्याचा म्हटलं जातं. पण ते चुकीचे आहे. जर तशी कोणाला नोटीस सापडली तर घेऊन या. मी लगेच आमदारकीचा राजीनामा देईन, असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान दिलीप वळसे-पाटलांच्या टीकेला राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय.
सत्तेत का गेलो : आंबेगावमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांच्या राजकारणावर टीका केली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 60 ते 70 आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत. तर राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा माझा,अजित पवार किंवा अन्य सहकाऱ्यांचा नव्हता. तर बहुसंख्य आमदारांचा होता. विकासकामे होत नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता होती. हा विषय आम्ही शरद पवारांकडे मांडला. पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आम्ही विचारविनिमय करुनच निर्णय घेतल्याचे वळसे-पाटील म्हणाले.
एकहाती सत्ता आली नाही : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असं आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकदीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही स्वतःच्या ताकदीवर त्यांना कुणाला मुख्यमंत्री करता आलं नाही. नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. पण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आलेली नाही.
वळसे-पाटील यांनी केलेल्या टीकेबद्दल आश्चर्य :दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक समजले जातात. त्यांचे वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील हे आमदार होते. वडिलांकडे राजकारणाचे बाळकडू गिरवत असतानाच दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्याकडे पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करू लागले. शरद पवार यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच त्यांना आंबेगाव मतदारसंघातून आमदारकी मिळाली. सलग सात वेळा वळसे-पाटील आंबेगाव मतदारसंघातून विजयी झाले. शरद पवार यांचे निकटवर्तीय असूनही त्यांच्याविरोधात बंड करणाऱ्या अजित पवार यांना वळसे-पाटील यांनी साथ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी स्वतःचे 'मेंटॉर' असलेल्या शरद पवार यांच्यावर टीका केली. याबाबत वाद वाढेल, असं लक्षात येताच वळसे-पाटील यांना बहुतेक शरद पवार हे त्यांचे 'राजकीय गुरु' असल्याची आठवण झाली आणि त्यांनी आपला उद्देश शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा नव्हता. आपण फक्त खंत व्यक्त केली, अशा शब्दांत आपली 'नवी भूमिका' मांडली.
निष्ठा विकली : दरम्यान, वळसे-पाटील यांनी पवार यांच्यावर टीका करताच शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अॅक्शन मोडवर येत 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट एक पोस्ट केली. यात त्यांनी वळसे-पाटील यांच्यावर सडकून टीका केली. वळसे-पाटील यांची नैतिक अधोगती झालीय. साहेबांचा विश्वासू असलेला साथीदार अत्यंत कृतघ्न निघाला. अनेक नेत्यांनी सत्तेसाठी निष्ठा विकल्याची टीका आव्हाड यांनी केलीय. आंबेगावातील नागरिक त्यांना धडा शिकवतील, असेही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा-
- EC Notice To Sharad Pawar : कोण आहे राष्ट्रवादीचा खरा बॉस ? तीन आठवड्यात उत्तर द्या; काका-पुतण्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
- Dilip Walse Patil : मी शरद पवारांना सोडून गेलो नाही, ते आमचे... - दिलीप वळसे पाटील