पुणे : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवासाठी मोदी शाह जबाबदार असल्याचा टोला एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी लगावला. ते पुण्यात एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातील नेते मंडळीदेखील कमीशन घेत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. कर्नाटकमधील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अपयश आहे. त्यामुळे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माझ्यावतीने दोन केरला स्टोरीचे तिकीट आणि पॉपकॉर्न स्पॉन्सर केले आहे. कर्नाटकाच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट होती की, भाजप देशावर जी हुकूमशाही लादत आहे. पण देशात लोकशाही जिवंत आहे, त्याचाच हा परिणाम असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता बोध घेईल: कर्नाटकाचा निकाल हा देशातील राजकारणाचा एक टर्निग पॉईंट आहे, असे जलील म्हणालेत. आज एका कार्यक्रमाला आले असताना खासदार इम्तियाज जलील माध्यमांशी बोलत होते. कर्नाटकातील पराभव हे मोदींचे अपयश आहे. मोदी आणि शहा यांना आता आरामाची गरज आहे. भावनिक मुद्द्यापासून जनता आता सावध झाली असून जनतेच्या दैनंदिन जीवनातल्या मुद्द्यावर कर्नाटकातील जनतेने मतदान केले आहे. त्याचा बोध महाराष्ट्रातील जनता सुद्धा घेईल, अशी आशा सुद्धा इम्तियाज जलील व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातही चालते कमीशनगिरी : कर्नाटकमध्ये सरकारने 40% कमिशन घेतले तीच पद्धत महाराष्ट्रात सुरू असून एक जबाबदार खासदार म्हणून मी सांगतो महाराष्ट्रातला एकही मंत्री असा नाही जो कमिशन घेत नाही. महाराष्ट्रात सुद्धा 20 टक्के कमिशन सरकार घेत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा इम्तियाज जलील केला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काश्मीर फाईल तर कर्नाटकांच्या निवडणुकीसाठी भाजपाने केरला फाइल्स नावाचा चित्रपट आणला परंतु केरला स्टोरीला कर्नाटक जनतेने उत्तर दिले आहे.
पुतळाऐवजी शाळा उभारा: औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का? असे विचारला असता माझा आधीपासून पुतळ्याला विरोध आहे. हे फक्त राजकारण केले जाते. मी पहिला असा खासदार आहे. जो गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक आयोजित या ठिकाणी हॉस्पिटल उभे करण्याची विनंती केली होती. त्याठिकाणी 400 बेड्सचे हॉस्पिटल उभेही केले. तोच विचार आपण महाराणा प्रतापाविषयी देऊन त्या ठिकाणी एखादी शाळा उभी केली तर त्यासाठी मी स्वतः माझ्या खिशातले पाच लाख रुपये द्यायला तयार आहे. सरकारने तसे करावे असे माझी इच्छा आहे, आणि तशाच कार्यक्रमांना मी जाईल, इम्तियाज जलील म्हणाले.
पाकिस्तानात जा-जा म्हणणारे पाकिस्तानात गेले : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले DRDOचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावरुन इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून 5 मेला अटक केली होती. व्हाट्सअॅ्पवरून कॉल आणि मॅसेजवरून पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संरक्षण संशोधन संस्थेच्या म्हणजेच DRDO च्या संचालक पदावर काम करत असलेले डॉ. प्रदीप कुरुळकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. हे तेच लोक आहेत, जे देशातील मुस्लिमांना पाकिस्तानात जा म्हणतात. पण आम्ही वारंवार हेच सांगत होतो, आम्हाला पाकिस्तानचे काही देणेघेणे नाही. आम्हाला जेव्हा विचारण्यात आले होते की, तुम्हाला पाकिस्तानात जायचे आहे की, भारतात राहायचे तेव्हा आम्ही सांगितले होते, हा भारत देश आमचा आहे. पण आम्हाला जा म्हणणाऱ्या लोकांना पाकिस्तान जास्त आवडतो, आम्हाला जा-जा म्हणणारेच आज पाकिस्तानात जाऊन बसले आहेत. इतकेच नाही तर येथीलसगळी गोपनीय माहितीही तिकडे दिली, असे जलील म्हणाले.
भ्रष्ट लोकांना देशाला विकायचे काम केले: प्रदीप कुरुलकर याच्या आरएसएसच्या कथित संबंधावर देखील इम्तियाज जलील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कुरुलकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचे आम्हाला काहीही आश्चर्य वाटत नाही. आपण इतिहास जर तपासून पहिला तर असे जे भ्रष्ट लोक आहेत की ज्यांनी आपल्या देशाला विकण्याचा काम केले आहे. ते लोक कोण होते हे सगळे समोर येईलच. असे देखील जलील म्हणालेत.
हेही वाचा -