महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Kesari : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा मंगळवारपासून रंगणार, महाराष्ट्र केसरीला महिंद्राचे अनोखे बक्षीस

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) मंगळवारपासून 10 ते 14 जानेवारी दरम्यान भरणार असूनराज्यभरातील ४५ संघांचे पैलवान १८ विविध वजनी घटात भिडणार आहेत. तर या स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'च्या (Maharashtra Kesari) विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.(Maharashtra Kesari Tournament 2023)

By

Published : Jan 8, 2023, 8:43 PM IST

Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी स्पर्धा

माजी महापौर मुरलीधर मोहोळ स्पर्धेविषयी माहिती देताना

पुणे : प्रतिष्ठित 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) थरार मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. १० ते १४ जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून, 'महाराष्ट्र केसरी'च्या (Maharashtra Kesari) विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली. (Maharashtra Kesari Tournament 2023)

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन : ६५ व्या 'महाराष्ट्र केसरी'च्या तयारीचा आढावा व भव्य मैदानाची पाहणी केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह संयोजन समितीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


अशी असेल व्यवस्था : यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, "कोथरूड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य ३२ एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून, त्यात १२ एकरमध्ये ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती व तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. २० एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. एका कार्डियाक ऍम्ब्युलन्ससह चार ऍम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, १००० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. सह्याद्री व जहांगीर हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पाहणार आहे."

या मान्यवरांची उपस्थिती : राज्यातील ४५ तालीम संघातील विविध १८ वजनी गटात सुमारे ९०० पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना 'जावा' ही मोटारसायकल व रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यानाही बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य व अंतिम लढतीची चुरस पाहायला मिळणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघांचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्याला गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर यापूर्वीचे महाराष्ट्र केसरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.


विरोधकांकडून दिशाभूल : भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीमार्फत ही स्पर्धा अधिकृतपणे घेण्याची जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानवर सोपवली आहे. राज्यातील ४५ तालीम संघांचे कुस्तीगीर, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. असे असतानाही खोडसाळपणे पत्रक काढून विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची 'महाराष्ट्र केसरी' यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून, अशा खोडसाळ गोष्टींवर लक्ष देण्याची गरज नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.


मामासाहेबांना अभिवादन :"स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरु झाली. यंदाच्या ६५ व्या 'महाराष्ट्र केसरी'चे संयोजन करण्याची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे आली, ही आनंदाची व गौरवाची बाब आहे. 'महाराष्ट्र केसरी'ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल अशा स्वरूपाची ही स्पर्धा होणार आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.


पैलवानांच्या स्वागताला आखाडा सज्ज : मातीचा आखाडा ही महाराष्ट्राच्या कुस्तीची ओळख आहे. दोन आखाड्यांत माती विभागातील कुस्ती होणार असून, पैलवानांच्या स्वागतासाठी आखाडा सज्ज आहे. पैलवानांना कुस्ती करताना अडचण होऊ नये, यासाठी त्यात हळद, मीठ, काव, लिंबू, तेल मिसळून खास आखाडा तयार केला जात आहे, असे विलास कथुरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details