महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने घेतली दगडूशेठ हलवाई बाप्पाचे दर्शन पुणे - पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करत ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आज शिवराज राक्षे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
14 वर्ष मेहेनत -मी जवळजवळ 14 वर्ष मेहेनत घेतली होती. वस्तादांनी माझ्याकडुन तशी मेहेनत करून घेतली होती. तसेच आई-वडिलांचे देखील स्वप्न होतं आणि मी बप्पाला साकडं घातलं होतं की जेव्हा गदा घेईल तेव्हा सर्वप्रथम तुझ्या चरणी येईल. आज महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सर्वप्रथम बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे असे यावेळी दर्शन घेतल्यानंतर महारष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऑलम्पिकसाठी विशेष लक्ष असणार - महाराष्ट्र केसरी साठी चारी पैलवानांपैकी आम्ही तिघेजण एकाच तालीमचे असून वस्ताद काका पवार यांनी सांगितल होत की काही करा पण कधी आंतरराष्ट्रीय संकुल म्हणजेच आपल्याच तालमीत यायला पाहिजे. महाराष्ट्र केसरीची गदा ही आज आमच्या तालीममध्ये आल्याचा आनंद होत आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रकुल तसेच ऑलम्पिक साठी विशेष लक्ष असणार असल्याचं यावेळी राक्षे याने सांगितल. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी, रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर, रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले आहे.
चीतपट करीत गदा नावावर - काल झालेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली. त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले.
मान्यवरांनी शिट्या वाजत केला जल्लोष -शिवराज राक्षे विजय झाल्यानंतर उपस्थित हजारो मान्यवरांनी शिट्या वाजत जल्लोष केला. तसेच त्याच्या मित्रमंडळींनी त्याला खांद्यावर उचलून संपूर्ण स्टेडियम भर फिरवले. यावेळी शिवराज याचा भाऊ हा भाविक झाला होता. त्यांनी आमच्या कुटुंबाचा नावलौकिक केल्या असल्याचं भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी त्याचे तालमीतील मित्र त्यांनी देखील जल्लोष साजरा केला.