Pune APMC Results : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास आघाडीने उडवला राष्ट्रवादीचा धुव्वा! - पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 18 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास आघाडीचा विजय
By
Published : Apr 29, 2023, 6:21 PM IST
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास आघाडीचा विजय
पुणे : आज राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची मतमोजणी झाली. यापैकी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. नवी मुंबई नंतर राज्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवत विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसला : 20 वर्षानंतर झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरांचा फटका बसला आणि आता याच बंडखोरांनी भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभवल केला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 18 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त 3 जागावर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयासह भाजपचा पुणे बाजार समितीमध्ये शिरकाव झाला आहे.
विजयी उमेदवार : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीतर्फे ग्रामपंचायत गटामध्ये रवींद्र कंद, सुदर्शन चौधरी हे विजयी झाले आहेत. तर सेवा सहकारी संस्था गटात रोहिदास उंदरे, दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, प्रकाश जगताप, नितीन दांगट आणि दत्तात्रय पायगुडे हे विजयी झाले आहेत. तर इतर मागास जातीय गटात शशिकांत गायकवाड आणि भटक्या विमुक्त जातीमध्ये लक्ष्मण केसकर हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल मधून रामकृष्ण सातव आणि नाना अबनावे हे विजयी झाले आहेत. तर स्वतंत्र हमाल गटात संतोष नागरे तसेच अर्थ व्यापारी गटांमध्ये बाप्पु भोसले आणि गणेश घुले विजयी झाले आहेत.
'हा तालुक्याचा विजय' :निकालानंतर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे नेते विकास दांगट म्हणाले की, हा विजय कोणत्याही पक्षाचा नसून तो तालुक्याचा विजय आहे. सहकार क्षेत्रामध्ये पक्षीय राजकारण न आणता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. आता आम्ही बाजार समितीच्या कामावर लक्ष देणार आहे. ज्यांनी माझ्यावर कारवाई केली त्यांना हवेली तालुका समजायला दहा जन्म घ्यावे लागतील, असा टोला यावेळी दांगट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना लगावला.