पुणे- प्लास्टिक हा पर्यावरणाला घातक ठरत असलेला घटक आहे. महानगरांमध्ये दररोज टनाने प्लास्टिक गोळा होतो. मात्र त्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्लास्टिक रिसायकल करण्याचे अनेक प्रयोग जगभर सुरू आहेत. मात्र, प्लास्टिक रिसायकल जरी केले तरी ते नष्ट होत नसल्याने कचऱ्याची समस्या कायम आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्लास्टिकपासून इंधन तयार करण्याचे प्रकल्प टाकले जात आहे.
महापालिकेकडून टाकल्या जाणाऱ्या प्रकल्पातून निर्माण होणारे इंधन व्यावसायिक वापरासाठी पुरवले जात आहे. तर, इंधन तयार झाल्यानंतर उरलेला टार हा रस्ते बांधणीसाठी उपयोगी ठरत आहे. या प्लस्टिक इंधन प्रकल्पासाठी महापालिका काही संस्थांसोबत काम करत आहे. त्यातली रुद्रा एन्व्हायरमेंटल सोल्युशन लिमिटेड ही एक संस्था आहे. या संस्थेचा जेजुरीला ३०० किलोचा प्लांट आहे. त्याचबरोबर, या संस्थेचे महापालिकेसोबत पुण्यातील नारायणपेठ भागात १२५ किलोचा एक प्लांट सुरू करण्यात आला आहे.