पुणे- शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना न्याय देणार आहे, मागील 31 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या सहकार्यामुळे कमी कालावधीत प्रभावी प्रचार करता आला. या यशात तिन्ही पक्षाचा मोठा वाटा आहे. या यशाचे सोने शिक्षण क्षेत्रात करता येणार आहे. येत्या काळात शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य न्याय देण्याची माझी भूमिका असणार आहे, असे प्रा. जयंत आसगावकर यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात अनेक संकटांचा सामना करीत जनतेची सेवा केली आहे. राज्यातील सुज्ञ मतदारांनी त्याची जाण आणि भान ठेवून विक्रमी मताचा कौल दिला. येत्या काळातही जनता केंद्रित कामांनाच महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य असेल, अशी भावना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कदम बोलत होते.