पुणे - स्वतंत्र भारतात गोपनीयता (प्रायव्हेसी) हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ती व्यवस्था निर्माण केली आहे. आज भारतीय जनता पक्षाने लोकांची प्रायव्हेसी संपवण्याचा काम सुरु केले आहे. मध्यप्रदेश आणि कर्नाटकात ब्लॅकमेलिंग करून भाजपनेच सत्ता मिळवली, हेही सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही शब्द बोलायला तयार नाही. हेच खऱ्या अर्थाने 'चोर के दाढी मे तिनका' आहे. दाढी कोणाची आहे हे आपल्याला माहीतच आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली. काँग्रेस नगरसेवक आबा बागूल यांच्यावतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पाठवण्यात येत आहे. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जासुसी करणे काँग्रेसचे काम नाही तर केंद्राचे आहे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट हा एक योगायोग होता. ही वेळ राजकारणाची नाही. जासुसी करणे आमचं काम नाही. जासुसी करण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. लोकांची प्रायव्हेसी संपवली आहे. इतकी मोठी घटना घडूनही लोकसभेत कोणीही बोलायला तयार नाही. आमचे काम हे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करणे आहे. कोण कोणाला भेटले याबाबत जासुसी करणे आहे, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.