पुणे -राज्यातील महाविकास आघाडी सरकार दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर मातोश्रीमध्येच बसलेले असतात, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते येथे बोलत होते.
'हे दिशाहीन सरकार आहे; शेतकरी, महिला, विद्यार्थी कुठल्याच प्रश्नावर सरकार गंभीर नाही' - bjp state president chandrakant patil
महाविकास आघाडी सरकार दिशाहीन सरकार आहे. ते शेतकरी, महिला, विद्यार्थी कुठल्याच प्रश्नावर गंभीर नाही, अशी टिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार? असे प्रश्नही उपस्थित केले. तसेच एक महिना झाला पण हे सरकार काहीही करत नाही. हे सरकार कोविडबाबत गंभीर नाही. शेतकरी प्रश्नाबाबत, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत, विद्यार्थ्यांबाबत गंभीर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा, असे काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार बोलले असतील तर त्यांनी आधी ओबीसी समाजाला याबाबत विचारावे. त्यांना हे चालणार आहे का? असे झाले तर गावोगावी संघर्ष होतील, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येईल या भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे पाटील म्हणाले.