पुणे - शहरातील सातत्याने वाढत जाणारी कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीरचा इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे शहराला या इंजेक्शनचा पुरवठाच झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही, तर पुणे शहराची रेमडेसीवीर इंजेक्शनची दररोजची मागणी 18 हजाराची आहे. परंतु पुरवठा केवळ 4 हजार इंजेक्शनचाच होत असल्याचे समोर आले आहे.
पुरठ्यापेक्षा मागणी जास्त -
पुणे जिल्ह्याची रेमडेसीवीर इंजेक्शनची दररोजची मागणी ही 1800 इतकी आहे. मात्र पुरवठा केवळ 4 हजार इतका होतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांत रेमडेसीवीरवरून गोंधळ वाढला आहे. सद्यस्थितीत पुणे शहराला 45000 रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज आहे. कमी पुरवठा होत असल्यामुळे हा आकडा रोज वाढतच आहे. या इंजेक्शनचा अधिक पुरवठा व्हावा, यासाठी केंद्र शासनाला राज्य शासनाने ही विनंती केली आहे. उत्पादकांनाही त्यांची उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठीचे आदेश दिले आहे. परंतु हे इंजेक्शन उत्पादन करण्यासाठी लागणार कालावधी 20 दिवसांचा आहे. इंजेक्शन तयार झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागत असल्याने तुडवडा जाणवत आहे.