राजगुरुनगर (पुणे) -पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यांत परतीच्या पावसाने शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला उशीरा झालेला पाऊस, त्यानंतर बोगस निघालेले बियाणे आणि त्यानंतर धो धो बरसणारा पाऊस आणि त्यामुळे शेतीची झालेली विदारक अवस्था हे या वर्षीच्या हंगामात चित्र आहे. यामुळे 'जगायचं कसं' अशी परिस्थिती झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; तत्काळ नुकसान भरपाईची मागणी - पुणे ढगफुटीसदृश पाऊस
परतीच्या पावसाने रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची कारवाई सुरू असल्याचे उपविभागीय कृषी आधिकारी मनोज ढगे-पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -चंद्रभागेला १३ वर्षानंतर महापूर; नदीकाठालगत असलेली सुमारे ६ कुटुंबे बाधित
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात भात पीक, बटाटा, भाजीपाला काढणीच्या तोंडावर आले होते. मात्र, कधी नव्हे अशा पावसाने एका रात्रीत सर्व पिके उद्ध्वस्त केली. त्यामुळे यंदाचा हंगाम पाण्यात गेल्याने सरकारने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
रब्बी हंगामासाठी कांद्याची रोपे तयार होती. तर, काही भागांत कांदा लागवड झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने कांद्याची शेतीच पाण्यात गेली. शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. तर, दुसरीकडे ऊसशेतीचा गळीप हंगाम सुरू होत असताना ऊस शेतीलाही तलावाचे स्वरुप आले आहे. यामध्ये ऊस मुळापासुन सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा -खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव; मच्छिमार चिंताग्रस्त, इतर जैवविविधता धोक्यात येण्याची भीती
पुणे जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी -
तालुका | शेतकरी | बाधित क्षेत्र (हेक्टर) |
भोर | 1389 | 270.48 |
वेल्हा | 708 | 148 |
मुळशी | 54 | 9.80 |
मावळ | 1319 | 511 |
हावेली | 655 | 250 |
खेड | 1493 | 775 |
आंबेगाव | 3661 | 1393 |
जुन्नर | 9225 | 3090 |
शिरुर | 867 | 666 |
पुरंदर | 3800 | 1200 |
बारामती | 16160 | 5743.50 |
दौंड | 4714 | 2299.40 |
इंदापूर | 5513 | 2390 |