महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटमार करणारी टोळी जेरबंद

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडुन दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

crime
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 19, 2020, 7:41 PM IST

दौंड(पुणे) -लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडुन दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

पाच डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास फिर्यादी संजय मिश्रीलाल मुनोत बार्शी येथून एसटीने कुरकुंभला उतरून दौंड येथे घरी जाण्यासाठी थांबले असताना त्यांना एका मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तीने दौंड येथे जाण्यासाठी लिफ्ट देतो असे सांगून त्याचे मोटरसायकलवर मागे बसवून भागवतवस्ती कॅनलपासून कॅनलचे भरावावरुन निर्जनस्थळी नेऊन तेथे मोटारसायकलवर थांबलेले त्यांचे दोन जोडीदार यांच्याजवळ नेऊन तिघांनी मिळून फिर्यादीस धमकी देवून त्याच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोख रक्कम, दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, घड्याळ व मोबाईल असा रुपये १ लाख ९४ हजारचा ऐवज जबरीने हिसकावून चोरी करुन घेवुन गेले. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी सापळा रचून केली अटक :

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुरकुंभ परिसरात करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओमकार गावडे ( रा.बेटवाडी) व त्याचे साथीदार हे चोरीचे मोबाईल व अंगठ्या विकण्यासाठी कुरकुंभ एसटी स्टँड समोर आले आहेत. यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांना तेथे चार जण संशयास्पद मिळून आले.

चार जण अटक :

याप्रकरणी ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे ( वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड जि.पुणे), राजेश संभाजी बिबे (वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बीड), अजय ज्ञानेश्वर पवार (वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे), विशाल दिलीप आटोळे (वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे) यांना अटक केली आहे.

आरोपींकडून हस्तगत केला मुद्देमाल :

आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांचेकडून १ पल्सर मोटरसायकल, २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २,२६,२७० रुपये किंमतीचा माल हस्तगत केला. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी ओंकार गावडे, राजेश संभाजी बिबे आणि अजय ज्ञानेश्वर पवार
यांनी मिळून प्लान करुन एका व्यक्तीस लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटल्याचे व त्यांचेकडे मिळालेल्या दोन अंगठया त्याच चोरीतील व पल्सर मोटरसायकल गुन्हा करताना वापरल्याचे सांगितले आहे. गुन्ह्यातील चोरलेला मोबाईल हा आरोपी विशाल दिलीप आटोळे यास दहा हजार रुपयाला विकल्याचे सांगितले. तो मोबाइलही हस्तगत केला आहे.

आणखी एका गुन्ह्याची कबुली :

आरोपी ओंकार गावडे, राजेश संभाजी बिबे आणि अजय ज्ञानेश्वर पवार यांची पोलीस पथकाने आणखी चौकशी केली असता त्यांनी सुमारे २० दिवसापूर्वी पहाटे ४ वाजता कुरकुंभ एमआयडीसी पुणे-सोलापूर हायवे लगतचे शिवरत्न लॉजच्या समोर लावलेल्या आयशर टेम्पोची काच फोडून टेम्पोत झोपलेल्या ड्रायव्हरच्या डोक्यात काठीने मारुन त्यास कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचे डॅशबोडमधील २८०० रुपये जबरीने चोरल्याचे सांगितले. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

कामगिरी करणारे पोलीस पथक :

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम,सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, दगडू विरकर यांनी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details