पुणे :लोकांमध्ये घबराट निर्माण होवून पळापळ होवुन चेंगराचेंगरीमध्ये जीवीतहानी व्हावी, या उद्देशाने दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब आहे, असा फोन पुणे पोलिसांना आला होता. या प्रकरणी धमकीचा खोटा फोन करून अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील 'जयश्री हॉटेल' परिसरातून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हो फोन आला होता.
दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब :या प्रकरणी पोलिसांनी योगेश शिवाजी ढेरे (रा. गोखलेनगर, विठ्ठल रुक्मीणी मंदीराजवळ जनवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. तेव्हा त्यांना लोणी काळभोर येथील हॉटेल जयश्री या ठिकाणी एक कॉलर थांबला आहे. तो कॉलर सांगत आहे की, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब आहे. तसेच कॉलर हा लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात आहे, अशी माहिती मिळाली होती. लगेच पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. कॉलरशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा फोन नंबर बंद मिळुन आला.