पुणे -मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांच्या दरम्यान लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे गर्दी करतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी लोणावळा परिसरात येऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केले आहे.
स्वातंत्र्य दिनी पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये पोलिसांची नजर चुकवून पर्यटनस्थळी येण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला. यावर्षी स्वातंत्र्य दिन शनिवार आला असून दुसऱ्या दिवशी रविवार हा सलग सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे लोणावळ्यात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लोणावळा पोलिसांनी हे आवाहन केले आहे.
लोणावळ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे भुशी धरणासह इतर नद्या, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या डोंगरांनी हिरवा शालू परिधान केल्याचे भासत आहे. लोणावळ्याचा सर्व परिसर नयनरम्य झाला आहे. निसर्गाचे हेच सौंदर्य पाहण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दरवर्षी येतात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पर्यटकांना येण्यास मज्जाव आहे. 15 ऑगस्ट रोजी पोलिसांची या भागावर करडी नजर असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 300 पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. यासर्वांना न्यायालयाने एकूण साडेतीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. खालापूर टोल नाका, राईवूड चौकी, खंडाळा याठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.