पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्या'च्या निमित्ताने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर आले. मोदींना त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाचा गौरव आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी 'लोकमान्य टिळक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. विरोधी गटाच्या 'इंडिया' आघाडीच्या सदस्यांनी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ नये अशी मागणी केली होती. इतर संघटनांनी पण अशीच मागणी केली होती. पण ही विनंती शरद पवारांनी मान्य केली नाही. भाजपाच्या विरोधात संयुक्त आघाडी उभी केली जात असताना विरोधकांच्या एकीसाठी हे बाधक ठरेल, असे 'इंडिया' आघाडीच्या सदस्यांना वाटत होते.
दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार दिला जातो. काही सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध करत मोदींच्या विरोधात संयुक्त आंदोलन केले. प्रमुख सामाजिक कार्यकर्ता बाबा आढाव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात सहभागी कार्यकर्यांनी काळे झेंडे दाखवत विरोध नोंदवला. विरोधक सदस्यांनी दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या मंडई येथे आंदोलन केले. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी या आंदोलनात भाग घेतला.