पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचे कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक चौक, मुख्य रस्ते अगदी सामसूम झाले आहेत. रस्त्यावर अत्यावश्यक सेवा, पासधारक कामगार इत्यादी वगळता इतर वाहनांना परवानगी नाही. परंतू, काही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करत असताना पाहायला मिळत आहे.
उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या परिसरातील नागरिक मात्र नियमांचे पालन करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी ज्या प्रकारे तीन दिवस सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य उर्वरित दिवस देखील पोलिसांना करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा -नवी मुंबई महापालिकेला माणसं मेल्याचा पण पुरस्कार द्या; भाजपा आमदाराची खरमरीत टीका
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून पासून दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले. दरम्यान, सुरुवातीच्या चारही दिवसांत शहरातील नागरिक हे लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद देत आहेत. आज (शुक्रवार) शहरातील मुख्य रस्त्यांसह परिसर सामसूम असल्याचे पाहायला मिळत आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रूंची वस्ती असल्याचे मानले जाणारा पिंपळे सौदागर हा भाग येतो. या परिसरात संगणक अभियंते राहतात त्यांच्याकडून देखील चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले. सांगवी परिसरात चार नाकाबंदीचे पॉईंट असून 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. शिवाय, गेल्या तीन दिवसात 200 पेक्षा अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ऐकून लॉकडाऊनमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 हजार 800 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.