पुणे (पिंपरी-चिंचवड)- सहा महिन्यानंतर पुणे ते लोणावळा लोकल सेवा सुरू झाली असून यात केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु, सर्वसामान्य नोकरदार आणि व्यावसायिकांचे काय? असा प्रश्न पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघाने उपस्थित केला. विशेष लोकल किंवा सिंहगड एक्सप्रेस प्रशासनाने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबई आणि लोणावळा येथे खासगी कर्मचारी, व्यवसायिक असे 700 ते 800 नागरिक दररोज ये-जा करतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सर्वच ठप्प होते. आता सर्व पूर्वपदावर येत असून केवळ रेल्वे अभावी अनेक खासगी नोकरदाराचे हाल होत असल्याचे रेल्वे प्रवाशी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी सांगितले आहे.
खासगी नोकरदारांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पुणे - लोणावळा - पुणे अशी लोकल सेवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सर्वसामान्य नोकदार वर्ग आणि व्यवसायिक यांच्यात नाराजीचा सूर असून सर्वसामान्य नोकदारासाठी देखील पुणे ते मुंबई पर्यंत धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यसरकारने लॉकडाऊन शिथिल करून नागरिकांना दिलासा दिला. शिवाय व्यवसाय सुरू करण्यास अटी आणि शर्थीसह परवानगी दिली. परंतु, संबंधित नोकरदारांचे नाहक हाल होत असून मुंबई किंवा लोणावळा येथे जायचं झाल्यास खासगी प्रवाशी वाहनाने जावं लागत असल्याने खिशाला झळ बसत आहे. तर, पुण्यातून रिझर्वेशन करून डेक्कन क्वीन पकडणे ही तारेवरची कसरत होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई येथे तब्बल सातशे ते आठशे खासगी कर्मचारी आणि व्यवसायिक दररोज ये-जा करतात. त्यामुळे या सर्वसामान्य नोकदार आणि व्यवसायिकांचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये व्यवसाय असणारे मात्र पिंपरी-चिंचवड शहरात राहणारे रवींद्र सरदेसाई म्हणाले की, माझा मोटारीचे पार्ट बनवणारा व्यवसाय गेली 15 वर्ष झाले मुंबईमध्ये आहे. तेथूनच सर्व काम चालतं, लॉकडाऊन पासून रेल्वे सेवा बंद झाली. परंतु, लोकल सेवा सुरू केली आहे. मात्र, ती अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी आहे. त्यामुळे खासगी नोकरदार आणि व्यवसायिकांनी काय करायचं? असा प्रश्न आहे. गेली सहा महिने झाले व्यवसाय बंद आहे, पुन्हा ग्राहकांची लिंक जोडणे अवघड आहे. तरी रेल्वे प्रशासनाने यावर विचार करून सर्वसामान्य नोकदार आणि व्यवसायिकांसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करावी.पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघाचे अध्यक्ष मुलाणी म्हणाले की, सहा महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद आहे. आज पुन्हा लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच डेक्कन क्वीन देखील सुरू करण्यात आली. परंतु त्यासाठी रिझर्वेशन करावं लागतेय. पिंपरी-चिंचवडमधून पुणे शहरात जाऊन डेक्कन ने पकडणे, ही तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नोकरदार वर्गासाठी देखील एक विशेष लोकल पुणे ते लोणावळा किंवा सिंहगड सुरू करावी. सर्वसामान्य नोकरदाराला सध्या सुरू करण्यात आलेल्या लोकलमध्ये प्रवेश नाही. लोकल सुरू नसल्याने खासगी वाहनाने मुंबई किंवा लोणावळ्याला जावं लागत आहे. त्यामुळे याची झळ थेट खिशाला बसत आहे. तरी प्रशासनाने लक्ष द्यावे.
हेही वाचा...