पुणे (बारामती) - कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील अटल इन्क्युबेशन सेंटर योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन, इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते.
'नूतन इन्क्युबेशन केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र व्हावे'
तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांच्या कल्पनांना पंख फुटले पाहिजेत. या पंखांना गरुडभरारी घेण्याचे बळ आपणा सर्वांना द्यायचे आहे. बारामतीमध्ये उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून हे काम होत आहे. नूतन इन्क्युबेशन केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.