पुणे -जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील कोकाटे मळ्यातील उसाच्या शेतात 20 ते 25 दिवस वयाचा बिबट्याचा मादी बछडा सापडला होता. हा बछडा माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या रेस्क्यू टिममुळे पुन्हा आईच्या कुशीत स्थिरावला आहे. ताटातूट झालेल्या आई आणि बछड्याच्या भेटीचा व्हिडिओ रेस्क्यू टीमने लावलेल्या कॅमेऱ्यात टिपला गेला आहे.
...आणि आईला आपला बछडा मिळाला हेही वाचा -मेळघाटातील मुख्य रस्त्यांवर वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार
बुधवारी दुपारी ऊसाच्या शेतात हा वीस ते पंचवीस दिवसांचा बिबट्याचा मादी बछडा आढळला. त्यानंतर या बछड्याला वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. आता मिशन होते ते बछड्याला पुन्हा त्याच्या आईच्या ताब्यात देण्याचे. रेस्क्यू पथकाने बछड्याला पुन्हा आईच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हेही वाचा -देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ७६ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; मृत्यूदर १.११ टक्क्यांवर
बछडा ज्या ठिकाणी शेतात सापडला होता तेथेच एका बॉक्समध्ये त्याला ठेवले. यानंतर रात्रीच्यावेळी बछड्याची आई त्याच्या शोधात शेतातील त्या ठिकाणी आली. तिने बछड्याला पाहिले. आजूबाजूला परिस्थितीचा अंदाज घेतला. मग, अलगदपणे बॉक्स आडवा पाडून बछड्याला आपल्या जबड्यात पकडून ती घेऊन गेली. हा सर्व प्रकार पथकाने त्या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला आहे. पथकाचे कर्मचारी डॉ. निखिल बनगर, एस. के. साळुंके, महेंद्र धोत्रे, अक्षय डोळस, अक्षय माळी, दीपक माळी, बाबाजी खर्गे आणि धोंडू कोकणे यांनी यासाठी परिश्रम घेतले.