जुन्नर (पुणे) -सुमारे 40 फूट खोल कठडे नसलेल्या विहिरीत नर जातीचा बिबट्या पडल्याची घटना घडली. या बिबट्याचे वय 18 महिने आहे. ही घटना तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यानंतर आज (बुधवारी) सकाळी वनविभाग, स्थानिक नागरिक, माणिकडोह बिबट निवारा केंद्राची रेस्क्यु टिमने पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीतुन सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्याला बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
बिबट्याचे रेस्क्यु यशस्वी..
मध्यरात्रीच्या सुमारास बिबट शिकारीच्या मागे धावत असताना अचानक कठडे नसलेल्या विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाकडुन व्यक्त केला जात होता. यानंतर आज सकाळी बल्लाळवाडी येथील खंडु डोंगरे हे शेतकरी शेताकडे जात असताना नर जातीचा बिबट्या पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती वनविभागास कळविल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. महेंद्र ढोरे, डॉ. निखील बनगर तसेच ग्रामस्थांनी विहिरीत दोराच्या साहाय्याने पिंजरा सोडून बिबट्याला जीवदान दिले आहे.