पुणे- दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्यास ताब्यात घेतले.
काल (बुधवारी) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाटस येथील टोल नाक्याजवळ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून तळाजवळच्या शितोळे वस्तीत बिबट्या गेला असल्याची माहिती, एका प्रवाशाने स्थानिक नागरिकांना दिली होती. त्यानंतर शितोळे वस्तीतील नागरिकांची याची माहिती वनविभागाला दिली होती.
वनविभागाचे कर्मचारी सकाळी बिबट्याची पाहणी करण्यासाठी येणार होते. पण, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाटस टोलनाक्यापासून जवळच्या अंतरावर एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्या ठार झाला. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले होते. रात्री बाराच्या सुमारास पाटस पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी हजर झाले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी नेले. बिबट्याचे शवविच्छेदन झाल्याची माहिती वरवंड वनपरिक्षेत्राचे वनपरीमंडल अधिकारी सय्यद रज्जाक यांनी सांगितले.
हेही वाचा - भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ, सांगवी पोलिसात गुन्हा दाखल