शिरुर (पुणे) - तालुक्यातील आंधळगाव येथील ऊर्जा डेअरीच्या समोर नुकतेच जन्मलेले बिबट्याचे पिल्लू रस्ता ओलांडताना आढळुन आले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला सुरक्षित बाजुला करुन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना आज (बुधवारी) दुपारच्या सुमारास घडली.
बिबट पिल्लू-मादीची भेट करणार वनविभाग -
आज दुपारच्या सुमारास आंधळगाव येथील ऊर्जा डेअरीच्या समोरील रस्त्यावर अचानक नुकताच जन्मलेला बिबट्याचे पिल्लू रस्त्यावरुन जाताना दिसुन आले. हे पिल्लू ऊसशेतीकडे जात होते. यावेळी रस्त्यावरुन वाहनांची गर्दी सुरु होती. तर या घटनेमुळे नागरिकांची पळापळ झाली. यानंतर या पिल्लूला स्थानिक नागरिकांनी बाजुला केले. तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. हे पिल्लू पुन्हा मादीकडे जाईल यासाठी वनकर्मचाऱ्यांनी त्याला बाजुच्या ऊसशेतीलगत ठेवले आहे. जोपर्यत या पिल्लूची आणि मादीची भेट होत नाही तोपर्यंत वनकर्मचारी नजर ठेवुन राहणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.