भीमाशंकर (पुणे) - श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दरवर्षी भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंदिरे ही बंद करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर भीमाशंकर हे मंदिर देखील बंद केले आहे. तसेच, येथील श्रावणी यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियमपाळून भीमाशंकर येथे विधिवत पूजा व आरती करण्यात आली. दरम्यान, दर्शनासाठी दूरदूरवरून नागरिक दाखल झाले होतो. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे त्यांना शिखराचेच दर्शन घेऊन परतावे लागले.
भीमाशंकर मंदिराची आख्यायिका -
समुद्र सापटीपासून सुमारे चार हजार फूट उंचीवर भीमाशंकर हे स्थान आहे. या मंदिराची आख्यायिका सांगताना येथील पुजारी सांगतात की, अर्धनारेश्वर म्हणजेच शंकर आणि पार्वती हे दोघेही एकत्र या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूराचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीने हे रूप धारण केले होते. त्यावेळी शंकराने तीव्र स्वरूपाचे उग्र रूप घेतले होते. यालाच भीमरूप असे म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे संबोधले जाते. अनाधी काळापासून हे मंदिर स्वयंभू असल्याचे येथील पुजारी सांगतात. विनायकराव भिडे यांनी या मंदिराचा इ.स. १२०० मध्ये जीर्णोद्धार केला आहे. समोरचा दगडी शिल्पामध्ये सभामंडप हा भाविकांची गर्दी ओळखून १९६४ मध्ये जीर्णोद्धार समितीने याचे काम पूर्ण केले आहे.