पुणे - स्वातंत्र्यानंतरचे पहिले हिल स्टेशन म्हणून चर्चा झालेल्या लवासा सिटीमधील मालमत्तेचा लिलाव होत आहे. या लिलावाचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस आहे.
काय आहे लवासा सिटी -
लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून 2000 साली पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरणाच्या परिसरात तब्बल 25 हजार हेक्टर परिसरात लवासा प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात आली. लवासा प्रकल्प हा स्वातंत्र्यानंतरचे पहिले हिल स्टेशन असेल, असा दावा त्यावेळी हा प्रकल्प उभारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार या प्रकल्पाकडे आकर्षित झाले होते. मात्र, या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. तसेच स्थानिकांच्या जमिनी खरेदीवरुनही मोठा वाद झाला होता. त्यानंतर लवासा प्रकल्पाचे कामकाज सुरू असले तरी सातत्याने वेगवेगळे वाद उभे राहिले होते. त्यातच 2010 साली तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी लवासा प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवत प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी कंपनीचे शेअर पडले होते आणि तेव्हापासूनच लवासा प्रकल्पाच्या आर्थिक अडचणींना सुरुवात झाली होती.
हेही वाचा - 'विद्वत्तेचा मक्ता पुणे-मुंबईच्या लोकांनी घेतला नाही'