बारामती -तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी माळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही. याबाबत सत्ताधारी व विरोधकांनी एक मताने शिक्कामोर्तब केले. माळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी म्हणजे ७७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
या ग्रामपंचायतीला असते विशेष महत्त्व -
माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीपेक्षा विशेष महत्त्वाची असते. माळेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गोविंद बाग हे निवासस्थान, माळेगाव सहकारी साखर कारखाना, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ यासह विविध संस्थांचा समावेश होतो. म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्व आहे.
नगरपंचायतीचा प्रस्ताव प्रलंबित -
माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर माळेगाव मधील सत्ताधारी विरोधकांबरोबरच ग्रामस्थांनी एकत्रित येत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व ७७ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे माळेगाव ग्रामपंचायतीची यंदा निवडणूक होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.