बारामती -महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र काँग्रेसवाल्यांचे अजिबात चालत नाही. काका-पुतण्यांंसमोर काँग्रेसच्या नेत्यांना किंमत नाही, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना पडळकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते माध्यमांमध्ये जे बोलतात, त्याच्याविरोधात मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती आरक्षणाबाबत जेव्हा बैठक झाली, तेव्हा काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले. त्यानंतर अवघ्या दोन तासातच अजित पवार यांच्या ट्विटरवरून सांगण्यात आले की, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, किंवा तशी चर्चाही झाली नाही. त्यानंतर पुन्हा नितीन राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, आम्ही मागणी मांडली आहे, त्याच्यावर निर्णय झाला नाही. म्हणजे हे माध्यमांसमोर बोलतात वेगळे आणि कॅबिनेटमध्ये वेगळाच निर्णय होतो. असेही पडळकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.