पुणे - बारामतीत 'कृषिक - 2020' प्रदर्शनाला राज्यासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 'अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच अन्य कृषीविषयक गोष्टींची माहिती देण्यात आली. आधुनिक शेतीसंबंधी प्रत्यक्षिकांचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातून शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांची माहिती देण्यात आली. यामध्ये पशुपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांवरही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सौर ऊर्जा, हवे वरील शेती, फळबाग लागवड यांसह दुग्धउत्पादन, फळ प्रक्रिया, कृषी पर्यटन हे शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. देशातील सर्वाधिक लहान (दोन फूट तीन इंच व तीन फूट) उंचीच्या गाई या प्रदर्शनाचे आकर्षण आहेत. या गाई मूळच्या आंध्र प्रदेश, केरळ व तामिळनाडू मध्ये आढळतात. प्रथमच अशा गाई पाहिल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पशुपक्षी प्रदर्शनात तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेला मालेगावचा पिंटू घोडा आकर्षण ठरत आहेत. तसेच खिल्लार व दानी गाय-बैल पाहायला पर्यटकांनी गर्दी केलीय.
याचसोबत दोन लाखांना मागणी करण्यात आलेली अकरा महिन्यांची खिलार जातीची कालवड, आठ दाती जातीचे बोकड, राजस्थानचे कोटा बोकड आणि बोर तसेच बायक वळू यांवर भेट देणाऱ्यांच्या नजरा खिळून आहेत. विविध नावलौकिक कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाच्या कृषी संशोधन संस्था, बँका, कृषी शिक्षण संस्था तसेच खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे यांच्याशी निगडीत बहुसंख्य कंपन्या सहभागी झाल्या आहेत.