पुणे : नऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी गावात रविवारी सायंकाळी स्थानिक महिला आपल्या घरासमोर बसली होती आणि त्यांची लहान मुले बाहेर खेळत होती. त्याचवेळेस दुचाकीवरून काही तरुण वेगाने गाडी पळवत ये-जा करत होते. महिलेने मुले खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवण्याची विनंती केली. त्याचा राग मनात धरुन त्या तरुणांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवेली पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिसांची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल :या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला आहे. गावातील एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी या सराईतांनी त्याला धमकावल्याचीही महिती मिळाली आहे. गांजाची नशा करुन हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुण्यात महत्त्वाचे कार्यक्रम, पण गुन्हेगारी शिगेला :पुणे शहरात आगामी होत असलेली आंतरराष्ट्रीय जी-२० परिषद, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांकडून शहर पिंजून काढण्यात येत आहे. कोयता घेऊन गुन्हेगारी करणाऱ्यांवरही पोलिसांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे. या मोहीमेत आतापर्यंत जवळपास 185 कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण 72 गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. असे असले तरी शहरात कोयता गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाही.