कोरेगाव भिमा History of Koregaon Bhima : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा इथं भीमा नदीच्या काठावर 1 जानेवारी 1818 ला दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत सर्व जाती-धर्मांचे 500 सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरलं होतं. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळताच पेशव्यांनी युद्धातून काढता पाय घेतला. परिणामी इंग्रजांचा या युद्धात विजय झाला होता.
बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी युद्ध : पुणे हा पेशव्यांचा बालेकिल्ला होता. मात्र, पुण्यावर ब्रिटिशांच्या सत्तेची पकड होती. आपला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले होते. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. पेशव्यांकडं 28 हजार सैन्य होतं. तर इंग्रजांकडे फक्त 800 सैनिक होते, असा दावा इतिहासकार करतात. कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हे युद्ध केलं.