पुणे (थेऊर) –थेऊर येथील श्री चिंतामणी अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण असून भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी या नावाने ओळखले जाते. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, या गणेशाच्या डोळ्यात माणिकरत्नही आहेत.
अष्टविनायकापैकी एक आहे थेऊरचा चिंतामणी पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त -
कपिल मुनींजवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते. गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नांच्या सहाय्याने त्यास पंचपक्वानांचे भोजन दिले. हे पाहून गणासूर स्तंभित झाला व त्याला त्या रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिलमुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार देताच त्याने त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले. कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले. कपिल मुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथे विनायकास चिंतामणी संबोधले जाऊ लागले व या नगरीस कदंबनगर म्हणू लागले.
पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून पुण्यापासून हे ३० किमी अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.
अशी आहे आख्यायिका -
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी या जागी गणपतीची आराधना केली होती. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : अष्टविनायकापैकी एक आहे रांजणगावचा महागणपती; जाणून घ्या काय आहे इतिहास