पुणे: भारत देश हा शेतीप्रधान देश असून भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि तेही पारंपरिक पद्धतीने आजच्या युगात तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असतात. आजपर्यंत आपण शेती हे खुल्या मैदानात तसेच मातीत करताना पाहिले आहे. पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाने आठ बाय पाचच्या कंटेनरमध्ये शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तरुणाचे नाव शैलेश मोडक आहे.
परदेशी नोकरीचा राजीनामा :शैलेश किशोर मोडक हा तरुण मूळचा नाशिकचा पुण्यात शिक्षणानंतर गेल्या 15 वर्षापासून तो आई- वडील भावंडासह पुण्यात वास्तविक आहे. त्याची पत्नी देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कंप्यूटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर शैलेश यांनी पुण्यातच मास्टर डिग्री शिक्षण पूर्ण करत सॉफ्टवेअर कंपनीत पहिली नोकरी केली. त्यानंतर त्याला परदेशातही नोकरीची संधी मिळाली. मात्र नोकरीचा राजीनामा देऊन त्याने खादी ग्रामोद्योगाचा मधमाशीपालनाचा कोर्स केला. मद्यमाश्यांच्या 60 पेट्या खरेदी करून त्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शैलेशने शेतीतज्ञ डॉक्टर विकास खैरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा कसा वापर होईल यावर भर दिला.
कंटेनरमध्ये केला शेतीचा प्रयोग:मग शेती विषयात अभ्यास करून शैलेश ने एक नवीन प्रयोग सुरू केला. तो ही असा प्रयोग की त्याच्या या शेतीने वर्षभर शेती ही करता आली पाहिजे. कारण शेती करत असताना शेतकऱ्याला वातावरण तसेच अवकाळी पाऊसाचा मोठा फटका बसत असतो. अश्या या समस्यांवर पर्याय म्हणून शैलेश याने एका कंटेनरमध्ये हा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाला. आणि त्यांनतर याच 8 बॉय 5 च्या कंटेनरमध्ये 1 एकर मध्ये जेवढी शेती होईल, तेवढं वेगवेगळे पिके शैलेश या कंटेनर शेतीतून काढू लागला.
आत्ता याच कंटेनरमध्ये लावलाय केशर:भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मिरमध्ये मिळणाऱ्या केशरची पुण्यात शेती शैलेशने सुरू केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती तो करत आहे. ते ही विना मातीची...
प्रयोग झाला यशस्वी: केशर हे तोळ्यावर विकले जाते. केशरचे महत्त्व भारतीय अन्न पदार्थात मोलाचे स्थान आहे. प्रतिग्रॅम ३०० ते १५०० रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. त्याच्या दर्जानुसार केशरचा भाव आपल्याला बाजारात पहायला मिळतो. कश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे केवळ मागणीच्या फक्त ३ ते ४ टक्केच उत्पादन भारतात घेतले जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून मोडक यांनी हा कंटेनर फार्मिंगचा प्रयोग पुण्यात राबवला असून तो यशस्वी देखील केला आहे.
असा केला तापमानात बदल:गेल्या 6 वर्षांपासून ते हा प्रयोग राबवत आहेत. हे एअरपोनिक पद्धत वापरून हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. 320 वर्गफुटाच्या कंटेनरमध्ये केशारची लागवड करून त्यासोबत इतर भाज्यांचे पीक घेतले आहे. यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, मसाले या पिकांना पर्याय शोधत शैलेश मोडक यांनी केशर हे पीक घेण्याचे ठरविले. प्राथमिक प्रयोगासाठी काश्मीरमधील पँम्पोरमधुन 12 किलो केशरचे कंद मागविले. त्यानतंर या कंदाच्या वाढीसाठी नियंत्रित पध्दतीने कंटेनरमध्ये तापमान ठेवले. यात त्याला हे कंद वाढत असल्याचे दिसल्यानतंर परत काश्मीरला जाऊन त्याने तिथल्या शेतकर्यांशी संवाद साधला. काही दिवस तिथे राहून केशर पिकाच्या लागवडीची पद्धत समजून घेतली. त्यानंतर सुरुवातीला कंटेनरमध्ये केशर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कंटेनरमध्ये केशर लावले. तसेच काश्मीर प्रमाणे कंटेनरमध्ये तापमान नियंत्रित करण्याकरता एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी, डीह्युमिडिफायर, आद्रता कमी- जास्त करण्याकरता चारकोलवर आधारीत तंत्र अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर, कंटेनरमध्ये तयार करण्यात आला. अशी माहिती यावेळी शैलेश याने दिली आहे.
सुमारे एक ते सव्वा किलो केशर मिळण्याची आशा: तसेच कृत्रिम प्रकाश संश्लेषणाकरता त्याच्या अवस्थेनुसार लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचा प्रकाशही याठिकाणी पुरविला जातो. सध्या शैलेश यांनी पुण्यातील वारजे परिसरात हा कंटेनर तयार केला आहे. एका ट्रेमध्ये आकारानुसार चारशे ते सहाशे कंद बसवले जातात. सध्या अर्ध्या कंटेनरमध्ये सुमारे पाचशे किलो कंदाची वाढ करता येणार आहे. त्यापासुन सुमारे एक ते सव्वा किलो केशर मिळण्याची आशा शैलेश यांनी व्यक्त केली आहे. सद्या केशरचा प्रति ग्रँम हा 499 इतका दर आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत: बाजारभावानुसार याचा दर किलोला 6 लाख 23 हजार 750 इतका आहे. कंटेनर तयार करण्यापासुन ते कंद आणण्यापर्यत 8 लाख इतका शौलला खर्च आला असल्याचे शैलेश यांनी सांगितले आहे. ही आधुनिक शेती पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहे. हा कंटेनर फार्मिंगचा आगळा वेगळा प्रयोग सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. आजच्या युवा शेतकऱ्याने देखील आधुनिक शेतीकडे उतरावे आणि शेतीचे वेगळे प्रयोग करून आधुनिक शेती करावी, अशी अपेक्षा देखील शैलेश मोडक यांनी व्यक्त केली आहे.