पिंपरी-चिंचवड (पुणे) - भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंमत असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हापूरला जाताना अडवून दाखवावे, असे आव्हान सोमैय्या यांनी दिले आहे. ते तळेगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणाले की, पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या विनंतीला मान देऊन पारनेरला जात आहे. 22 हजार शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्यात स्वप्न पाहिले होते. मात्र, काही व्यक्तींनी कारखाना गिळंकृत केला आहे. त्या शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मी पारनेरला निघालो आहे. कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
हेही वाचा-धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य
28 सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार
पुढे किरीट सोमैय्या म्हणाले, की 26 सप्टेंबरला (रविवारी) अलिबागला जाणार आहे. 28 सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहे. हे ठाकरे सरकारला कळविले आहे. आता पाहुया, ठाकरे सरकार पुन्हा एकदा घोटाळेबाज हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी मला पुन्हा एकदा थांबविण्याचा प्रयत्न करते का? नियमांचे पालन करून दर्शन घ्यायचे आहे. अंबाबाईला प्रार्थना करतो की, ठाकरे सरकारला सदबुद्धी दे, असा खोचक टोलाही सोमैय्या यांनी लगावला आहे.