पुणे - खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बदनामी करणारे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते व अन्य दोघांवर कडक कारवाई करावी. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असे एक निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.
कारवाई झालीच पाहिजे -
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याचे नेतृत्त्व करत आहेत. तीन वेळा विधान सभेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करून खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व इतर काही मंडळी सातत्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
काय आहे बदनामी प्रकरण -
सातारा येथील एका तरूणीला हाताशी धरून दिलीप मोहिते पाटलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. डॉ. शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व सोमनाथ शेंडगे या तिघांनी त्या तरूणीला पैशांचे व पुणे येथे फ्लॅट घेवून देण्याचे आमीष दाखवून आमदारांवर आरोप करण्यास सांगितले आहे. मात्र, त्या तरूणीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयुर साहेबराव मोहिते पाटील यांना संपर्क केला. शैलेश मोहिते, राहुल कांडगे व सोमनाथ शेंडगे यांनी आमदारांविरुध्द असा कट रचला असल्याची माहिती दिली. त्यामुळे मयुर मोहिते पाटील यांनी त्या तरूणीची भेट घेतली व सातारा पोलीस ठाण्यात सविस्तर गुन्हा दाखल केला.
पक्षातील आमदाराची एवढ्या खालच्या पातळीवर जावून बदनामी करणाऱ्या डॉ. शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व सोमनाथ शेंडगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा विश्वासघातकी लोकांची पक्षातून तात्काळ हाकालपट्टी करावी, अशी मागणी एका निवेदनातून पदाधिकाऱ्यांनी केली आहे. असे न झाल्यास खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असेही या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -दिलासादायक! पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढली