पुणे :शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, भारत 2036 च्या स्पर्धेचं यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीनं पूर्वतयारी करत आहे. त्यामुळे राज्यानंही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थानं आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 जानेवारी हा दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं यावेळी घोषित केलं. मात्र या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं आपलं क्रीडा मंत्रीपद गेल्याची सल बोलून दाखवल्यानं मोठी चर्चा करण्यात येत आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे शिवछत्रपती 'राज्य क्रीडा पुरस्कार' वितरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करा :यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. क्रीडा तज्ज्ञ आणि खेळाडूंच्या सहकार्यानं आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना तयार करण्यात यावी. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावरही भर द्यावा लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्र हे क्रीडा धोरण बनविणारं पहिलं राज्य आहे. आजही देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्याचा दबदबा आहे. महाराष्ट्रानं राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम सामूहिक कामगिरीसाठी अधिक तयारी करण्याची गरज आहे. विशेषत: स्थानिक खेळांकडंही लक्ष द्यावं लागेल, असं असंही राज्यपाल म्हणाले. राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
खाशाबा जाधवांचा जन्मदिन आता 'राज्य क्रीडा दिन' :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारं देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्रानं घवघवीत यश मिळवलं आहे. चौथ्या 'खेलो इंडिया युवा स्पर्धे'त 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदकं मिळवली. तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह 140 पदकं मिळवून अव्वल कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवलं. ऑलिम्पिकमध्येही चांगलं यश मिळावं यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा 'राज्य क्रीडा दिन' म्हणून घोषित केला.