बारामती Asha Pawar Wants Ajit Pawar CM :मी हयात आहे, तोपर्यंत माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी व्यक्त केलीय. बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी आज मतदानाला सुरुवात झालीय. काटेवाडीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मातोश्री आशा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. तेव्हा माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आशा पवार यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलीय.
- काटेवाडीत तिरंगी लढत : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. महायुतीत असलेल्या शिंदे- फडणवीस आणि पवार यांच्यातच थेट लढत असल्याचं चित्र काटेवाडीत आहे. त्यामुळं अवघ्या महाराष्ट्राचं काटेवाडी ग्रामपंचायतीकडे लक्ष लागलं असून प्रतिष्ठेची लढत म्हणून बघितलं जातंय.
महायुतीतील घटक पक्षामधील लढत : बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. तर काटेवाडी ही पवार कुटुंबीयांच्या नावानं ओळखली जाते. गेली कित्येक वर्षांपासून काटेवाडी ग्रामपंचायतवर पवार कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादीमधून बंड केलेले अजित पवार, शिंदे- फडणवीस यांच्या सत्तेत सामील झाले. तरीही महायुतीत एकत्र असलेले शिंदे -फडणवीस आणि पवार यांच्यामध्येच काटेवाडी ग्रामपंचायत जिंकण्यावरून काटे की टक्कर बघायला मिळत आहे. यावर्षी भाजप, शिंदे गटदेखील सरपंच पदाच्या या निवडणुकीत नशीब आजमावत अजित पवार गटाला टक्कर देत आहे. असं असलं तरी अजित पवार गटाचं प्राबल्य जास्त असल्याने शिंदे गट आणि भाजप अजित पवार गटाच्या आव्हानासमोर टिकणार का हे बघावं लागेल.