पुणे : विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
कसबा मतदारसंघ : पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघातील आहे. हा मतदारसंघ कसबा म्हणूनही ओळखले जातो. या मतदारसंघाला 'हार्ट ऑफ पुणे सिटी' असेही संबोधले जाते. 1995 पासून या जागेवर भारतीय जनता पक्षाचा कब्जा आहे.
मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व : पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे 25 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1995 ते 2019 पर्यंत भाजप आमदार म्हणून कसबा मतदारसंघात बाजी मारली आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. कसबा मतदारसंघात 1990 ते 2019 पर्यंत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
असा आहे इतिहास :विधानसभेच्या या निवडणूकीत मुक्ता टिळक यांनी 75492 मते मिळवत कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कसबा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे रोहित टिळक यांचा पराभव केला होता. यावेळी गिरीश बापट यांना 73594 तर रोहित टिळक यांना 31322 मते मिळाली होती. भाजपच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या इतिहास कसबा मतदारसंघ अव्वल मतदारसंघांपैकी एक आहे. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार काळुराम उदानसिंग परदेशी यांनी मतदारसंघ विजय मिळवला होता. या मतदारसंघात 1962 ते 2019 पर्यंत एकूण 12 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. कसबा मतदार संघाच्या इतिहासात १९६२ पासून ते आतापर्यंत मुक्ता शैलेश टिळक (भाजप) या एकमेव महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.