पुणे: कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल गुरूवारी (2 मार्च) रोजी जाहीर होणार आहे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. यानंतर निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पोटनिवडणूकीसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यानंतर या दोघे मतदारसंघांसाठी रविवार (26 फेब्रुवारी) रोजी मतदान पार पडेल. अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या पोटनिवडणूकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसबा मतदारसंघ:भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाले. यामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणूकीत सुरूवातीला भाजपकडून टिळक कुटुंबीयातूनच उमेदवारी जाहीर केली जाईल, असे वाटत होते. पण भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी देत त्यांच्यासाठी प्रचाराची मुहर्तमेढ रोवली. दरम्यान, टिळक कुटुंबियांना उमेदवारी जाहीर न केल्यामुळे ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितले जात होते. पण ही नाराजी दूर करण्यात आल्याचे भाजपकडून सांगितले गेले. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
चिंचवड मतदारसंघ: भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणूकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत ही अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत. कसबा मतदार संघात दुहेरी लढत तर चिंचवड येथे तिहेरी लढत पाहायला मिळाली आहे. यामुळे या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.