पुणे :व्यवसाय, शेती, भाडे आणि मानधन असा हेमंत रासने यांच्या उत्पन्नाचा मार्ग आहे असे रासने यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. रासने यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोभूर्ले, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील गोरड, म्हशीवली आणि हवेली माळुंगे येथे जमीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बोरगड टाळसुरे येथेही हेमंत रासने यांची जमिनी आहे.
हेमंत रासने यांच्या सदनिका :पुणे शहरातील सदाशिव पेठ व बुधवार पेठ येथे सदनिका आहेत. हेमंत रासने यांच्याकडे 9 कोटी 81 लाख 41 हजार 362 रुपयाची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर 2 कोटी 81 लाख 12 हजार 357 रुपये किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. मुलीच्या नावावर 54 लाख 8 हजार 423 रुपये, मुलाच्या नावे 1 कोटी 56 लाख 578 रुपयाची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. अशी एकूण 14 कोटी 73 लाख 39 हजार 720 रुपयाची मालमत्ता हेमंत रासने कुटुंबाकडे आहे असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता :कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8 कोटी 36 लाख 10 हजार रुपयाची स्थावर जंगम मालमत्ता आहे. 25 तोळे सोने, तसेच धंगेकर यांच्या नावे 35 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नींच्या नावावर 32 लाख 8 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले आहेत.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल :रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रात संपत्तीविषयी माहिती देण्यात आली आहे. धंगेकर यांचे आर्थिक वर्षातील उत्पन्न 3 लाख 36 हजार इतके आहे. त्यांच्या शेती व सोने चांदी कारागिरी बांधकाम हा व्यवसाय आहे. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे. धंगेकर यांची जंगम मालमत्ता 47 लाख 6 हजार 128 रुपये तर पत्नीकडे 68 लाख 67 हजार 376 रुपयाची मालमत्ता आहे. स्थावर मालमत्ता 4 कोटी 59 लाख 27 हजार 916 रुपये आहे .त्यांच्या पत्नीकडे 2 कोटी 60 लाख 72 हजार 994 रुपयाची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी 10 तोळे सोने तर पत्नीकडे 15 तोळे सोने आहे. रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ मंगळवार पेठ कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यात शेती असून कोथरूड येथे 4,500 चौरस फुटाची जागा आहे.
हेही वाचा :Sudhir Mungantiwar: दाढी वाढवल्याने कोण प्रधानमंत्री होत नाही, तर त्याला बुद्धी वाढवावी लागते- सुधीर मुनगंटीवार