पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवारी) काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून आज पुण्यात आंदोलनसुद्धा करण्यात येत आहे. एकंदरीतच विधान परिषदेच्या तीन जागा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. याचीच प्रचिती आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी भरण्यासाठी आलेल्या दिग्गज काँग्रेसने त्याच्या हजेरीवरून लक्षात येते.
कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर : कसबा पोटनिवडणूक काँग्रेसकडून लढविण्यात येत असून यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्ज भरतेवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. भाजपकडून हेमंत रासने, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हे दोन्ही उमेदवार आज अर्ज भरत आहेत. त्याअगोदर दोन्ही उमेदवारांकडून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती करण्यात आलेली आहे.
चुरशीची लढत होणार :कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज प्रमुख पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत. रविंद्र धंगेकर यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडे रवाना झाले. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. कारण, यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लक्ष घालून आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा आज पुण्यात आले आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरला. त्यामुळे पुण्यातील ही लढत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजपासून प्रचार सुरू होईल आणि उमेदवार आपापल्या भूमिका मतदारासमोर मांडतील. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी आणि उमेदवाराला मिळणारा पाठिंबा पाहता काँग्रेसचा कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये उत्साह वाढलेला आहे. नेत्यांच्या हजेरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आलेला आहे यावेळी आमदार संग्राम थोपटे देखील उपस्थित होते.