पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज 26 तारखेला सकाळपासून सुरवात झाली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदार त्यांचा हक्क बजावणार आहेत. सकाळपासूनच नागरिक आपले हक्क बजावण्यासाठी येत आहे. त्यामुळे मतदानासाठी निवडणूक यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात : पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार या मतदार संघामध्ये आहेत. 270 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 26 फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 250 निवडणूक अधिकारी व निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मोठ्या संख्येने मतदान : आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक हे मतदानाला येत आहे.विविध बूथ वर सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी गर्दी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक सकाळ च्या वेळेतच मतदान करत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे. कसबा पोट निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरले होते.