पुणे :महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप करत पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे नेते मंडळी हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे. पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर रवींद्र धंगेकर हे उपोषणाला बसणार आहेत. त्यांचे हे उपोषण एकदिवसीय असणार आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीचा विषय जोरदार गाजत आहे.
पोलिसांचा बंदोबस्त ठेवणार :कसबा गणपती मंदिरासमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर उपोषणावर ठाम असून ते आणि त्यांची बायको स्वतः उपोषण स्थळी निघाले आहे. माझी एकच मागणी आहे की माझ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांना घेऊन पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी धंगेकर यांनी केली आहे. मी गेल्या 30 वर्षापासून माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना संभाळत आहे. माझे कार्यकर्ते हे माझे घर आहे आणि त्यांना जर कोणी त्रास देत असेल तर हे मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका असे यावेळी रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार :शुक्रवारी पाच वाजता प्रचार संपला तरी भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी, पालकमंत्री त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात आहे. भाजप पदाधिकारी पोलिसांच्या मदतीने पुणे कसबा मतदार संघात पैसे वाटप करत आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना धमक्या देण्यात येत आहे. मतदार संघ सोडून गावाला जायची दमदाटी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात ते पुण्यातील कसबा गणपती मंदिराच्या समोर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित असणार आहेत असे त्यांनी म्हटले.