दौंड(पुणे)-दौंड तालुक्यातील खडकी या गावात तोतया आर्मी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी ताब्यात घेतले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत याबाबत माहिती मिळाली होती.
दौंड तालुक्यातील खडकी गावातील प्रशांत विजय काळे हा व्यक्ती भारतीय लष्करात कोणत्याही पदावर नेमणुकीस नसतानाही तो भारतीय लष्करात १४ सिख रेजिमेंटचा मेजर असल्याची बतावणी करत होता. ही माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्याने त्याबाबत खातरजमा करण्याकरीता पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वात खडकीला पाठवले होते.
तोतया आर्मी अधिकारी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खडकी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सापळा लावून इंडियन आर्मी लोगो असलेला खाकी रंगाचा टी शर्ट घातलेल्या प्रशांत विजय काळे, उर्फ रोबोस्ट आण्णा (वय२७, रा. खडकी) याला ताब्यात घेतले.काळे याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या मित्रांजवळ लोकसेवक असल्याची बतावणी केल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय सेना दलाची विविध पदके, चिन्हे, सेनादलातील नियुक्तीचे पत्र, सेना दलात विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दिली जाणारी पदके, सन्मानचिन्ह, लोगो, भारतीय सेना दलाची कपडे, मोबाईल फोन असा ९ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल काळे याच्या घरातून जप्त करण्यात आला. काळे विरोधात दौंड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ४१९, १७०, ४६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दौंडचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात स.पो.नि.दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार रौफ इनामदार, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, निलेष कदम, महेष गायकवाड, रविराज कोकरे, अनिल काळे, पोलीस नाईक गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांचा समावेश होता.